रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- दिव्यांग व्यक्तींवरील छळ, हिंसाचार आणि शोषणाच्या घटनांना आळा बसावा तसेच त्यांच्या हक्कांचे आणि सुरक्षिततेचे प्रभावी संरक्षण व्हावे, यासाठी राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम ७ नुसार, दिव्यांग व्यक्तींवरील अत्याचारांविरुद्ध त्वरित आणि प्रभावी कार्यवाही करणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने उपविभागीय दंडाधिकारी (SDM) आणि जिल्हा दंडाधिकारी (DM) यांना अशा प्रकरणांवर कायदेशीर तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
राज्यातील सर्व जिल्ह्यांत या तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी व्हावी म्हणून एकसमान मानक कार्यपद्धती (Standard Operating Procedure – SOP) तयार करण्यात आली आहे. हा अधिकृत जीआर दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी प्रसिद्ध केला असून, संबंधित यंत्रणांना आवश्यक ती तातडीची पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे दिव्यांग व्यक्तींच्या सुरक्षेसाठी प्रशासन अधिक जबाबदार ठरणार असून अत्याचाराच्या कोणत्याही घटनांवर त्वरित कारवाईस मार्ग मोकळा झाला आहे.




