रिपोर्टर नूरखान
अमळनेर :-“सत्ता किंवा पद नव्हे, तर खऱ्या अर्थाने परिवर्तन” या घोषवाक्यासह समाजसेवेची वाटचाल करणारे स्वेच्छा निवृत्त पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनिल दयाराम महाजन यांनी अमळनेर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १३(ब) मधून आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
महाजन यांनी सांगितले की, “जर पद किंवा पैसा हेच ध्येय असते तर नोकरीतच राहिलो असतो. पण माझा उद्देश समाजपरिवर्तनाचा आहे. गेल्या सत्तर वर्षांपासून शहरातील लहान-लहान वार्डांतील मूलभूत समस्या — पाणीटंचाई, गटार, वीज, मोकाट जनावरे, मच्छर, कुत्रे आणि कचरा व्यवस्थापन — अद्याप सुटलेल्या नाहीत. हे दाखवते की कुठेतरी प्रतिनिधित्वात त्रुटी राहिल्या आहेत.”
ते पुढे म्हणाले, “अमळनेर शहराला आता स्वच्छ, नवा आणि कार्यक्षम चेहरा हवा आहे. मी ‘नो पॅग, नो मटण’ या तत्त्वावर जगतो — म्हणजेच शुद्ध विचार आणि स्वच्छ दृष्टिकोन ठेवतो. मला २४ तास काम करण्याची सवय आहे आणि तीच ताकद शहराच्या सेवेसाठी वापरणार आहे.”
सुनिल महाजन यांनी “मत आपले आणि उमेदवारी माझी” या घोषवाक्याने प्रचार मोहिमेला प्रारंभ केला असून, शहरातील गोरगरिब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची बांधिलकी त्यांनी व्यक्त केली आहे.
महाजन हे एम.ए. (इतिहास), डी.एड., एसईटी (इतिहास), डबल बी.ए. आणि डबल पीईटी अशा उच्च शैक्षणिक पात्रतेसह निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. समाजसेवक, शिक्षकवृत्तीचे आणि नवपरिवर्तनवादी म्हणून त्यांची ओळख आहे.




