रिपोर्टर नूरखान
अमळनेर :-तालुक्यातील वाढत्या बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर अंकुश आणण्यासाठी आणि शासकीय महसूलाचे नुकसान थांबविण्यासाठी वाळू-गौण खनिज लिलाव प्रक्रिया तात्काळ राबवावी, अशी मागणी अमळनेर तालुका काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी अमळनेर यांना निवेदन देण्यात आले.
सध्या तालुक्यात कायदेशीर वाळू उपलब्ध नसल्याने बांधकाम कामे ठप्प झाली आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत काही वाळू माफिया बेसुमार दराने वाळू विक्री करून शासन महसूल बुडवीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. परिणामी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गावर टीका होत असून, समाजात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मांडळ, सावखेडा, डोंगकोद, बोहरा, संधारी, मुंगसे, परफोरे यांसह एकूण 15 ठिकाणी वाळूच्या लिलाव प्रक्रियेची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. त्यामुळे शासन महसूल वाढेल, बांधकामधारकांना योग्य दरात वाळू मिळेल आणि बेकायदेशीर उपसा थांबेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
काँग्रेस पदाधिकारी संदीप घोरपडे व भागवत सूर्यवंशी यांनी दिलेल्या निवेदनात प्रशासनाने तातडीने लिलाव प्रक्रिया सुरू न केल्यास काँग्रेस पक्ष आक्रमक आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.




