रिपोर्टर नूरखान
“शिवसेना संपवणं कोणाच्याही बसची गोष्ट नाही” – माजी आमदार शिरीष चौधरींचे वक्तव्य
अमळनेर :- स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित कार्यकर्ते मेळाव्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यास माजी आमदार शिरीष चौधरी, महिला आघाडीच्या व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यात बोलताना माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले, “अमळनेर नगरपालिकेवर आजपर्यंत शिवसेनेचा भगवा फडकलेला नाही. मात्र शिवसेना संपवण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी हा पक्ष कधीच संपणार नाही. सुरुवातीच्या काळात फक्त सात नगरसेवकांसह आम्ही कार्याला सुरुवात केली होती. त्या सात हिंदुस्तान्यांच्या ताकदीवर आज हजारो शिवसैनिक माझ्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे अमळनेरमध्ये शिवसेना अधिक बळकट होणार यात शंका नाही,” असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “शिवसेना हा विचारांचा पक्ष आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणे आणि गोरगरिबांची सेवा करणे हेच आमचे ध्येय आहे. माझा धंदा म्हणजे शेती आणि जनसेवा. कितीही भांमट्टे आले तरी शिवसेनेचे काहीही वाकडे करू शकत नाहीत,” असे चौधरी म्हणाले.
या वेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार अनिल पाटील यांना टोला लगावत म्हटले, “काही लोक जाती-पातीचे राजकारण करतात. आम्ही आणि आमचा पक्ष सरळ विचारांचा आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणं हीच आमची ओळख आहे,” असे ते म्हणाले.
चौधरी यांनी या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेही आभार मानले आणि पुढील निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन जनतेशी संवाद साधण्याचे आवाहन केले.
मेळाव्यादरम्यान उपस्थित शिवसैनिकांनी ‘जय शिवसेना’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमवला.




