रिपोर्टर नूरखान
निवडणूक तापली; ठेकेदारी आणि सत्तेच्या मोहात सेवाभाव हरवला?”
अमळनेर :- शहरात आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीचा ताप दिवसेंदिवस वाढू लागला आहे. विविध पक्षांचे संभाव्य उमेदवार मतदारांशी संपर्क मोहिमा राबवतांना दिसत आहेत. मात्र, या प्रचारातून काही भावी नगरसेवकांचे वागणे आणि भाष्य नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.
नागरिकांमध्ये असा सूर उमटतो आहे की, अनेक उमेदवारांना आपल्या प्रभागातील मूलभूत समस्या, पाणीपुरवठा लाईन, गटार व्यवस्था, रस्त्यांची टेंडर माहिती याबाबत ज्ञान नसतानाही ते “मी पुढचा नगरसेवक” अशा भावनेत फिरतांना दिसतात. काहींच्या सोशल मीडियावरील पोस्ट आणि प्रचारफेरींमुळे “अमळनेरात राजकारणापेक्षा तमाशाच जास्त दिसतोय” अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत.
अमळनेर शहर परंपरेने शांत, सुसंस्कृत आणि संयमी म्हणून ओळखले जाते. मात्र, सध्या काही “भावी नगरसेवक” वादग्रस्त पद्धतीने प्रचार करत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. “पालिका निवडणूक ही जनतेच्या सेवेसाठी असते, ठेकेदारीसाठी नाही,” अशी टीका स्थानिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या प्रचारात काही उमेदवारांचा कल विकासापेक्षा ठेकेदारी, सत्ता आणि पैशाच्या प्रभावाकडे अधिक असल्याचे दिसून येते. “जर असेच लोक नगरपालिकेत गेले तर भविष्यातील प्रशासन गोंधळात आणि ठेकेदारांच्या दबावाखाली जाण्याची भीती आहे,” अशी चिंता जनतेत व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी पक्षपातळीवर उमेदवारांची चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक नागरिक मात्र यावेळी “सेवाभावी आणि प्रामाणिक” उमेदवारांना संधी द्यायची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. “अमळनेरचं मन विकत घेतलं जात नाही, ते जिंकावं लागतं,” असं मत काही ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केलं.




