रिपोर्टर नूरखान
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनजवळील एका क्षुल्लक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून काही विकृत तरुणांनी केलेल्या मानसिक छळाला कंटाळून जालना जिल्ह्यातील एका तरुणाने आपले जीवन संपवले आहे.महेश आडे असे मृताचे नाव आहे. महेशला काही दिवसांपासून धमक्या आणि त्रास दिला जात होता, या जाचाला कंटाळून अखेर त्याने आत्महत्या केली. या घटनेने सोशल मीडियावरील ‘ट्रोल्स’च्या क्रूरतेचा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.
काय आहे नेमकी घटना?
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील ढोकमाळ येथील रहिवासी असलेला महेश आडे आणि त्याचा एक मित्र काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या बोर्डाजवळ लघुशंका करत असतानाचा व्हिडिओ काही तरुणांनी शूट केला. संबंधित तरुणांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेनंतर महेश आणि त्याच्या मित्राने व्हिडिओद्वारे माफीही मागितली होती. मात्र, त्यानंतरही क्रूर आणि विकृत मानसिकतेच्या काही तरुणांनी महेशला सातत्याने त्रास देणे सुरूच ठेवले.
धमक्या आणि मानसिक छळ
वारंवार काही अज्ञात तरुण महेशला फोन करून आणि सोशल मीडियाद्वारे धमक्या देत होते. हा मानसिक छळ महेशसाठी असह्य झाला. समाजात बदनामी झाल्याच्या भीतीतून आणि या तरुणांच्या त्रासाला कंटाळून अखेर महेश आडे याने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले. या घटनेने महेशच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
महेशच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे, महेशला मानसिक त्रास देणाऱ्या आणि धमक्या देणाऱ्या स्वप्नील देशमुख, श्रेयश जाधव, पवनराज जाधव, अजय प्रधान पाटील, राकेश पंडित. सुरज मताने आणि आणखी एकावर त्यांच्या इंस्टाग्राम आयडीवरून, आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या आरोपींचा आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘ट्रोल’ टोळीचा कसून शोध घेत आहेत.




