रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- शहरातील प्रताप कॉलेज जवळ उभारण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या क्रीडा संकुलात सध्या दारू पिणाऱ्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, परिसरात दारूच्या बाटल्यांचे ढीग, घाण आणि असामाजिक घटकांची वर्दळ दिसून येते.
मिळालेल्या माहितीनुसार, या संकुलात कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाही. गेट बसवण्यात आलेले नाही तसेच सुरक्षा रक्षकही नेमण्यात आलेला नाही. त्यामुळे काही गुंड प्रवृत्तीचे युवक, दारू पिणारे आणि टवाळखोर मंडळी रात्रीच्या वेळी येथे जमून दारूच्या बाटल्या फोडतात.
सध्या पोलीस भरतीसाठी तयारी करणारी अनेक मुले-मुली येथे सरावासाठी येतात. मात्र, मैदानावर फुटलेल्या बाटल्या आणि घाण यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन क्रीडा संकुल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, चारही बाजूंनी भिंत किंवा गेट उभारून सुरक्षारक्षक नेमावेत, अशी नागरिकांची मागणी आहे. तसेच या ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.




