रिपोर्टर नूरखान
करणखेडा ता. अमळनेर :- संघर्षातून उभं राहणाऱ्या तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरणारा आदर्श उदाहरण म्हणजे करणखेडा (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील हर्षल कैलास पाटील. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) तर्फे सोमवारी जाहीर झालेल्या निकालात हर्षलने केवळ २२ व्या वर्षी सीए फायनल परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार केले आहे.
हर्षल हा कैलास आत्माराम पाटील आणि कल्पना पाटील यांचा मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी पाटील कुटुंब नवसारी (गुजरात) येथे स्थायिक झाले. वडील कैलास पाटील यांनी स्वतः फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतले असले तरी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचा निर्धार सोडला नाही. कामगार म्हणून सुरू केलेल्या आयुष्याच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या, तरीही त्यांनी शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन मुलांच्या शिक्षणासाठी झटले.
हर्षलने आपल्या यशाविषयी बोलताना सांगितले की, “चार्टर्ड अकाउंटंट क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे अभ्यास, जिद्द आणि सातत्य आवश्यक आहे. आई-वडिलांच्या कष्टांचे चीज करणे हीच माझी खरी जबाबदारी आहे. माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा मला अभिमान आहे.”
हर्षलच्या या यशामुळे नवसारी आणि करणखेडा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील नागरिकांनी पेढे वाटून या यशाचा आनंद साजरा केला. वडील कैलास पाटील आणि आई कल्पना पाटील यांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू दाटले.
हर्षल पाटीलचे नाव आता संघर्षातून उभ्या राहिलेल्या नव्या प्रेरणास्तंभांपैकी एक म्हणून घेतले जात आहे.




