रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर भरविण्यात आलेल्या ‘प्रगतिशील महाराष्ट्र 2025’ प्रदर्शनाची बुधवारी उत्साहात सांगता झाली. खासदार स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली भरलेल्या या प्रदर्शनात केंद्र सरकारच्या सर्व खात्यांचा समावेश करून उत्तम समन्वय साधल्याबद्दल वस्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी त्यांचे कौतुक केले.
तीन दिवसांत सुमारे १२ हजार नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. प्रमुख पाहुणे आ. राजूमामा भोळे यांनी शासकीय अधिकारी आणि जनतेतील थेट संवादाचे हे आदर्श उदाहरण असल्याचे सांगितले.
समारोपप्रसंगी विविध शासकीय विभागांच्या उत्कृष्ट स्टॉल्सना पारितोषिके देण्यात आली. मुनिशन्स इंडिया लिमिटेड, भारतीय रेल्वे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, महागेनको आदी विभागांनी उत्कृष्टता दाखवली. विद्यार्थ्यांच्या शोधप्रकल्प स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली तर आभार प्रदर्शन दीपकसिंग मेहता यांनी केले.




