रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- खानदेश शिक्षण मंडळ दिलेल्या निविदेनुसार तयार करण्यात आलेली ५५५२ मतदारांची रंगीत छायाचित्रासह मतदार यादी संस्थेचे सचिव पराग पाटील यांच्या ताब्यात दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सुपूर्द करण्यात आली आहे. या यादीची शहानिशा क्लार्क भटू चौधरी यांनी केली असल्याची माहिती मिळाली आहे.
यादी तयार करताना काही मतदारांची छायाचित्रे उपलब्ध न झाल्याने ती अपूर्ण राहिल्याचे सांगण्यात आले. हरविलेली छायाचित्रे शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले, मात्र काही फोटो मिळू शकले नाहीत. याबाबत मागील बैठकीत संचालक मंडळाने आवश्यक सहकार्याचे आश्वासन दिले होते, परंतु अपेक्षित मदत मिळाली नाही, अशी माहिती संबंधित प्रतिनिधींनी दिली.
मतदार यादी तयार करताना फॉर्म भरून घेण्यासाठी प्रतिनिधींना प्रचंड परिश्रम घ्यावे लागले. यादीतील अनेक मतदारांचे पत्ते चुकीचे असल्याचेही लक्षात आले. तरीदेखील मागील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार जितकी छायाचित्रे उपलब्ध होतील तितकी समाविष्ट करून यादी अंतिम करण्यात आली, असे सांगण्यात आले.
यादी ठरल्यानुसार पूर्ण करून सुपूर्द केल्यामुळे संबंधित संस्थेने ठरलेली रक्कम देण्याची मागणी केली आहे. तसेच, छायाचित्रासह मतदार यादी प्रसिध्द करण्यात यावी, अशीही मागणी संस्थेकडून करण्यात आली असून, त्यांना योग्य ते उत्तर देण्याची विनंती करण्यात आली आहे.




