रिपोर्टर नूरखान
स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेला आवाहन – अमळनेरमध्ये चर्चेचा विषय ठरला “खरा नगरसेवक कोण?”
अमळनेर : राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, विविध नगरपालिकांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक गंभीर प्रश्न पुढे आला आहे — आपल्याला कसा नगरसेवक हवा आहे?
आजकाल काही जण सोशल मीडियावर बॅनरबाजी करून, रील्स तयार करून स्वतःला “नगरसेवक” समजतात. मात्र नगरसेवक हा केवळ प्रसिद्धीचा विषय नसून, तो जनतेच्या समस्या सोडवणारा आणि विकासाचा मार्ग दाखवणारा असतो, असा जनतेमध्ये विचारमंथन सुरू झाले आहे.
नगरसेवकाचे काम ,नगरसेवक हा वॉर्डातील जनतेचा प्रतिनिधी म्हणून प्रशासन आणि नागरिकांमधील दुवा असतो. रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि स्थानिक विकासाच्या योजना राबवणे ही त्याची जबाबदारी असते. केवळ सोशल मीडियावर सक्रिय असणारा नव्हे, तर मैदानात उतरून नागरिकांच्या अडचणींना प्राधान्य देणारा नेता आवश्यक आहे, अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे.
स्थानिक स्वराज्य म्हणजे लोकशाहीचा पाया.
महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत या संस्था म्हणजे शहराच्या लोकाभिमुख प्रशासनाची पायाभरणी आहेत. या संस्थांमधून कार्यरत होणारा प्रत्येक नगरसेवक हा बदल घडवू शकणारा, नेतृत्व दाखवू शकणारा आणि सत्ता घडवू शकणारा असतो.
उमेदवारांसाठी मार्गदर्शक ‘मास्टरप्लॅन’
आज अनेक तरुण, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिक राजकारणात पाऊल टाकत आहेत. मात्र ठोस योजना, प्रभावी संघटन आणि मतदारांशी विश्वासाचं नातं नसल्याने बरेच उमेदवार गोंधळतात. यावर उपाय म्हणून एका नव्या पुस्तकात स्थानिक निवडणुकीसाठी मास्टरप्लॅन दिला असून, त्यात वॉर्ड अभ्यास, मतदारांशी संवाद, प्रचार रणनीती, सोशल मीडिया वापर, मतदानाच्या दिवशीचे नियोजन आणि निवडणुकीनंतरची जबाबदारी यांचे सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
“नुसता उठला-सुटला आणि सोशल मीडियावर बॅनर लावून स्वयंघोषित नगरसेवक होणं पुरेसं नाही. खरा नगरसेवक तोच, जो वॉर्डाच्या प्रत्येक समस्येला स्वतःची जबाबदारी मानतो,” असे स्थानिक नागरिकांचे मत आहे.
स्थानिक स्वराज्य निवडणुका म्हणजे लोकशाहीचा सण असला, तरी मतदारांनी जबाबदारीने विचार करूनच मतदान करावे, आणि काम करणाऱ्या, पारदर्शक नेतृत्वाची निवड करावी, असा सर्वसाधारण संदेश या चर्चेतून उमटत आहे.




