रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- गुजरातच्या अहमदाबादमध्ये 12 जून 2025 रोजी विमान दुर्घटना झाली. या भीषण विमान अपघाताला 6 महिने झालेत. विमानात एकूण 242 प्रवासी होते. त्यातल्या 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. फक्त एक व्यक्ती भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक रमेश विश्वास कुमार बचावला.
त्याचं वाचणं हे इतरांसाठी चमत्कार आहे. पण रमेश कुमारसाठी मात्र हा मोठा मानसिक आघात आहे. रमेश कुमार अजूनही या अपघाताच्या भीषण आठवणींमधून सावरु शकलेला नाही. त्याने त्याचं जिवंत असणं हा चमत्कार आणि शिक्षा दोन्ही असल्याचं सांगितलं. रमेश या मानसिक त्रासातून जातोय.
रमेश अपघात झाल्यानंतर अनेक महिन्यांनी लीसेस्टरला परतलाय. पण अजूनही तो पूर्णपणे व्यवस्थित नाहीय. त्याची विद्यमान स्थिती तपासल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की, तो पोस्ट-ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डरने (PTSD) पीडित आहे. अपघातानंतर रमेशला चालता-फिरताना अनेक अडचणी येत आहेत.
रमेश कुमार काय म्हणाला?
रमेश बीबीसीशी बोलताना म्हणाला की, “त्या अपघातातून मी एकटा जिवंत वाचलो. त्यानंतर अजूनपर्यंत मला विश्वास बसत नाहीय, हा एक चमत्कार आहे” त्या अपघातात रमेशच्या भावाचा मृत्यू झाला. “माझ्यासाठी माझा भाऊ सर्वकाही होता. मागच्या अनेक वर्षांपासून तो माझ्यासोबत होता” असं रमेश म्हणाला.
आता रमेश कुमारची अवस्था काय?
“आता मी एकटा आहे. मी माझ्या खोलीत एकटा बसून असतो. मी माझी पत्नी आणि मुलाशी सुद्धा बोलत नाही. मला माझ्या घरात एकट्याला रहायला आवडतं. अपघातानंतर मी आणि माझं कुटुंब अजून यातून सावरलेलं नाही. मी अजून कोणाशी बोलत नाही. मी जास्त बोलू शकत नाही. मी संपूर्ण रात्र-रात्र विचार करत असतो. मी मानसिक दृष्टया त्रस्त आहे. संपूर्ण कुटुंबासाठी प्रत्येक दिवस वेदनादायी असतो” असं रमेश कुमार यांनी सांगितलं.
एअर इंडियाकडून रमेशला किती पैसे मिळाले?
अपघातानंतर एअर इंडियाने मृतकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली. एअर इंडियाने रमेशला 21,500 ब्रिटिश पाउंड (22 लाख रुपये) नुकसान भरपाईचा प्रस्ताव दिला आहे. रमेशने हा प्रस्ताव मान्य केला. त्याच्या कुटुंबाच्या मते ही रक्कम खूप कमी आहे.
रमेश फ्लाइटमध्ये कुठल्या सीटवर बसलेला?
गुजरातच्या अहमदाबादमध्ये 12 जूनला हा भीषण अपघात झालेला. अहमदाबादवरुन लंडनला निघालेलं AI 171 विमान उड्डाणानंतर काही मिनिटात कोसळलं. या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. यात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. यात रमेश कुमारचा भाऊ अजय सुद्धा होता. रमेश फ्लाइटमधील सीट 11 वर बसलेला.




