रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर एक संवेदनशील निर्णय घेतला आहे. यंदा त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करता, त्या खर्चातून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी, आधार फाउंडेशनचे कार्यकर्ते, तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी मोठ्या उत्साहात कार्यक्रम आयोजित करत असतात. मात्र, यावर्षी अमळनेर तालुका तसेच मुडी मांडळ जिल्हा परिषद गटातील वासरे, खेडी, खर्दे या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे कापूस आणि मक्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी श्री. पाटील यांनी आपला वाढदिवस साजरा न करता त्या निधीचा वापर करणार असल्याचे जाहीर केले आहे.
सभापती पाटील यांनी आवाहन केले आहे की,
“माझ्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, कर्मचारीवृंद आणि हितचिंतकांनी पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू देण्याऐवजी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. तोच माझ्यासाठी खरा आणि समाधानकारक वाढदिवस ठरेल.
या निर्णयामुळे अमळनेर परिसरात सर्वत्र प्रशंसनीय प्रतिक्रिया उमटत असून, सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केल्याबद्दल सभापती अशोक आधार पाटील यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.




