धुळे:
शहरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने गुरुवारी नगावबारी परिसरातून अटक केली. त्याच्या ताब्यातून मॅगझिनसह पिस्तुल आणि जिवंत काडतूस असा एकूण ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धडाकेबाज कारवाई
जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल साई किशन समोरील सर्व्हिस रोडवर एक संशयित तरुण शस्त्र घेऊन फिरत आहे.
शिरपूरच्या तरुणाला बेड्या
मिळालेल्या माहितीनुसार, एलसीबीच्या पथकाने तात्काळ नगावबारी शिवारात सापळा लावला. यावेळी संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या राहुल पांडुरंग पाटील (वय २९, रा. वरवाडे, ता. शिरपूर) याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्याकडे ४० हजार रुपये किमतीचा मॅगझिनसह देशी बनावटीचा गावठी कट्टा (पिस्तुल) आणि १ हजार रुपये किमतीचा एक जिवंत राउंड मिळून आला.
गुन्हा दाखल
पकडण्यात आलेल्या आरोपीवर पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीने हे शस्त्र कशासाठी आणले होते, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
कारवाईत सहभागी पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोउनि चेतन मुंढे तसेच अंमलदार पवन गवळी, आरीफ पठाण, राहुल सानप, देवेंद्र ठाकुर व मयुर पाटील यांच्या पथकाने केली.




