रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर यांच्या त्रैवार्षिक निवडणुकीसंदर्भात प्रकाशित करण्यात आलेल्या मतदार यादीबाबत सभासदांकडून हरकत नोंदविण्यात आली आहे. मंडळाने प्रसिद्ध केलेली फेलो, पेट्रन व व्हाईस पेट्रन सभासदांची मतदार यादी ही फोटोविरहित असल्यामुळे सदस्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी दैनिक जनवास्तव मध्ये मतदार यादीवरील हरकती मागविण्याची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्या अनुषंगाने काही सभासदांनी मंडळाकडे लेखी हरकत दाखल करून, मतदार यादीत प्रत्येक सभासदाचा फोटो, आधारकार्ड, पत्ता व मोबाईल क्रमांक नमूद करून ती सुधारित स्वरूपात प्रसिद्ध करावी, अशी मागणी केली आहे.
सभासदांचे म्हणणे आहे की, फोटोविरहित यादीमुळे ओळख पटविणे कठीण होते. त्यामुळे येत्या १९ नोव्हेंबर २०२५ बुधवार रोजी प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी ही फोटोसह व आवश्यक तपशीलांसह नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत खान्देश शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सभासदांनी पारदर्शकतेच्या दृष्टीने मतदार यादी फोटोसह उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे.
यावेळी प्रसाद शर्मा सहित सर्व सभासद उपस्थित होते.



                                    
