रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- राज्यातील बहुप्रतीक्षीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे.
या पत्रकार परिषदेत नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची चिन्हं आहेत. याशिवाय आज किंवा उद्यापासूनच राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्येच ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने तयारीला सुरुवात केली आहे. राज्यातील या निवडणुका तीन टप्प्यात होण्याची चिन्हं आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका, 42 नगरपंचायतीची निवडणूक पार पडणार आहे. 21 दिवसात निवडणूक प्रक्रिया पार पडताना तात्काळ दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची सुद्धा घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाऊ शकते. तर शेवटच्या टप्प्यात महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तीन टप्प्यांत पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल. नगरपालिका निवडणुकीची घोषणा मंगळवारी केली जाण्याची शक्यता वर्तविली जाते. यामुळे राज्यात आचारसंहिता लागू होईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेणे अनिवार्य आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखांची घोषणा करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकांमध्ये राज्यातील 289 नगरपालिका, 32 जिल्हा परिषदा, 331 पंचायत समित्या आणि 29 महानगरपालिकांचा समावेश असणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकांवर केंद्रीत झाले आहे.



                                    
