रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- शहरातील शिवाजी महाराज नाट्यगृह परिसराजवळील हाशिमजी शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरात अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. या कॉम्प्लेक्समधील काही मोठ्या दुकानदारांनी दुकानाबाहेर पत्र्याचेशेड उभारून, टेबल-खुर्च्या ठेवून आणि मोकळी जागा व्यापून अतिक्रमण केल्याची तक्रार समोर आली आहे.
अतिक्रमणामुळे शेजारच्या छोट्या व्यापाऱ्यांच्या दुकानांवर परिणाम झाला असून, त्यांच्या दुकानांची दृश्यता कमी झाल्याने व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होत आहे. काही ठिकाणी तर दुकानांवर लावलेल्या लाईट्स आणि शेडमुळे इतर दुकाने पूर्णपणे झाकली गेल्याचेही दिसून आले आहे.
या अतिक्रमणामुळे त्रस्त झालेल्या एका व्यापाऱ्याने नगरपरिषदेकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक व्यापारी व नागरिकांनीही वाढत्या अतिक्रमणाविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “मोठ्या दुकानदारांचे अतिक्रमण तात्काळ हटवावे. या अतिक्रमणामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते, मोटरसायकली उभ्या राहतात आणि अपघाताची शक्यता वाढते. प्रशासनाने त्वरीत कारवाई करून रस्ता मोकळा करावा.”
या तक्रारीवर नगरपरिषद काय कार्यवाही करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



                                    
