रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- राज्याच्या शालेय शिक्षण विभागातील नागपूर विभागात उघडकीस आलेल्या बोगस शालार्थ आयडी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सहभागी ६७२ शिक्षकांकडून पगार उचलून शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या वेतनाच्या वसुलीसाठी पोलिसांकडून न्यायालयात मागणी करण्यात येणार आहे.
नागपूर विभागातील शाळा संचालकांकडून बोगस कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी तयार करून शेकडो शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. त्याच आधारे अधिकाऱ्यांशी संगनमत करीत बोगस शालार्थ आयडी तयार केले.
उपसंचालक कार्यालयातून याविरोधात तक्रार झाल्यावर हा घोटाळा उघडकीस आला. मात्र, चौकशीदरम्यान सदर पोलिस ठाणे आणि सायबर पोलिसांनी उपसंचालक, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शाळा संचालक आणि शिक्षकांवर गुन्हे दाखल केले. आतापर्यंत २५ जणांना अटक करण्यात आली. सध्या एसआयटीमार्फत प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सोबतच दोन्ही ठाण्यांकडून स्वतंत्रपणे चौकशी सुरू असून सायबर पोलिसांकडून अद्यापही चौकशीसाठी शिक्षक आणि अधिकाऱ्यांना बोलाविण्यात येत आहे.
सध्या सायबर पोलिसांकडे ६७२ शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचे दोषारोपपत्रही न्यायालयात सादर केले आहे. मात्र, आता या सर्वच शिक्षकांकडून त्यांनी बोगस आयडीद्वारे उचल केलेल्या पगाराची वसुली करण्यासाठी कलम १०७ नुसार मागणी करण्यात येत आहे. न्यायालयाकडून तशा सूचना मिळताच, पोलिसांकडून शिक्षकांना वसुलीसाठी पत्र पाठविण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.
केवळ एक-दोन शिक्षक आले चौकशीला.
सायबर पोलिसांकडून शिक्षकांना सातत्याने चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. चौकशीला येताना, त्यांना सोबत संबंधित कागदपत्रे आणण्यास सांगण्यात आले होते. जवळपास दीडशे शिक्षकांना चौकशीसाठी बोलाविण्यात आल्यावरही केवळ एक ते दोन शिक्षकच कागदपत्रे घेऊन चौकशीला हजर झाल्याची माहिती आहे.




