रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- एका इच्छुक उमेदवाराने मतदार यादीतील काही मतदारांच्या फोटोसह एक बॅनर लावला आहे. या बॅनरवर निवडणूक आयोगाला आव्हान देण्यात आलं आहे. या मतदारांचे घर शोधून दाखवा आणि माझ्याकडून पाच लाखांचे बक्षीस मिळवा असं थेट आव्हान देण्यात आलं आहे.
या प्रकारामुळे बोगस मतदारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर आहेत. त्या आधी या गोष्टींची पडताळणी करा असं या बॅनरच्या माध्यमातून सुचित करण्यात आलं आहे. हा बॅनर अंबरनाथमध्ये लावण्यात आला असून त्याची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे.
अंबरनाथ पूर्वेच्या महालक्ष्मीनगर परिसरात हा बॅनर आहे. प्रवीण गोसावी यांनी हा बॅनर लावला आहे. ते आगामी निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. पण मतदार याद्या घोळाबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे त्यांनी लावलेल्या या बॅनरची चांगलीच चर्चा आहे. तसेच या बॅनरवर दावा करण्यात आला आहे की 2009 पासून ही नावे प्रत्येक निवडणुकीतील आहेत. शिवाय माझे राज्य निवडणूक आयोगाला आव्हान आहे की त्यांनी या मतदारांची घरे शोधून द्यावीत.
जर ही घरे शोधून दाखवली तर माझ्याकडून तब्बल पाच लाख रुपयांचे बक्षीस मिळवावे. अन्यथा बोगस सदृश्य नावे यादीतून काढावीत असे आवाहन गोसावी यांनी राज्य निवडणूक आयोगाला केले आहे. दरम्यान या बॅनरमुळे विभागातील नागरिक हा बॅनर पाहण्यासाठी गर्दी करत असून बॅनरवर असलेले मतदार आपल्या ओळखीचे आहेत का याची खातरजमा करत आहेत. मात्र सध्या चर्चेत असलेल्या मतदार यादीतील घोळबाबत शहरात जोरदार चर्चा सुरू झाली असून निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेते हे पहावे लागेल.




