रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- अमळनेर नगर परिषद निवडणूक २०२५ पार्श्वभूमीवर शहरातील प्रथितयश सेवाभावी व्यक्तिमत्त्व डॉ. परीक्षित श्रीरामजी बाविस्कर यांनी नगराध्यक्षपदासाठी आपली इच्छुक उमेदवारी जाहीर केली आहे. “विकासाकडे एक पाऊल” या घोषवाक्याखाली शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.
शिवबाबा निवास, इंदिरा गांधी शाळेजवळ राहणारे डॉ. बाविस्कर हे एम.बी.बी.एस., एम.डी. शिक्षणप्राप्त असून, त्यांनी मुंबईसारख्या महानगरात वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या संधी असतानाही आपल्या जन्मभूमी अमळनेरमध्येच लोकसेवा करण्याचा निर्णय घेतला.
जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असताना त्यांनी असंख्य गंभीर, क्रिटिकल रुग्णांना जीवनदान दिले आहे. सर्पदंशग्रस्त रुग्णांच्या उपचारात त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले. तसेच, कोरोना काळात जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीचे सदस्य म्हणून त्यांनी विविध आरोग्य उपाययोजना मांडल्या व राबवल्या.
डॉ. बाविस्कर यांनी जिल्हाभरात अनेक मोफत आरोग्य शिबिरे घेतली असून, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, पोलीस दल व पत्रकार संघ यांच्यासाठी आरोग्यसेवेचे उपक्रम सतत राबवले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे ते जिल्ह्यात एक लोकप्रिय व सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
“नगरपालिकेचे नेतृत्व हे सत्तेचे नव्हे तर सेवेचे केंद्र असावे,” असे प्रतिपादन करत डॉ. बाविस्कर म्हणाले की, “शहराच्या आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, पाणीपुरवठा व सर्वांगीण विकासासाठी मी स्वतःला समर्पित करणार आहे.”
शहरातील विविध सामाजिक संस्था व नागरिकांकडून डॉ. बाविस्कर यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, येणाऱ्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी ही चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे.




