रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- नगरपालिकेच्या हद्दीतील अनेक ठिकाणी सार्वजनिक मुताऱ्या आणि शौचालये उभारण्यात आलेली आहेत. मात्र, या ठिकाणी अत्यावश्यक सुविधा नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
- शहरातील अनेक सार्वजनिक मुताऱ्यांमध्ये लाईटची सुविधा नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधार असतो. या अंधाराचा फायदा घेत काही असामाजिक प्रवृत्तीचे लोक तेथे बसतात, ज्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच, स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव दिसून येतो. अनेक ठिकाणी मुताऱ्यांचे दरवाजे तुटलेले, भिंती फुटलेल्या, पाण्याची व्यवस्था नसलेली, तसेच दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
नागरिकांची मागणी आहे की, नगरपालिकेने तत्काळ सार्वजनिक मुताऱ्यांमध्ये लाईट, पाणी आणि स्वच्छतेची व्यवस्था करावी तसेच त्यांची नियमित देखरेख ठेवावी.




