रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- शहरातील पूज्य साने गुरुजी उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, अलीकडील अवकाळी पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे पुलावरून जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
या उड्डाणपुलावरून धार, मारवाड, गावाकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच जड वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा या पुलावरून नेहमीच प्रवास असतो. या खड्ड्यांमुळे कधीही गंभीर अपघात होऊ शकतो, अशी शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पुलाच्या मध्यभागी पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे लोखंडी सळया ,सळई बाहेर दिसत आहेत. या भागाखालीच रेल्वे ट्रॅक आणि विद्युत वायरिंग असल्यामुळे अपघात झाल्यास थेट रेल्वे वाहतुकीलाही धोका निर्माण होऊ शकतो.
म्हणूनच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे प्रशासनाने तात्काळ या खड्ड्यांची दुरुस्ती करून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. तात्पुरते नव्हे, तर दर्जेदार आणि कायमस्वरूपी काम करून हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




