रिपोर्टर नूरखान
अमळनेर:- दिवाळीच्या सणानिमित्त शहरातील पालिका कामगारांचा सत्कार करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम प्रभाग क्रमांक १ चे माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी यंदाही राबविला.
वर्षभर शहर स्वच्छ, सुटसुटीत आणि सुबक ठेवण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई विभाग, पाणीपुरवठा विभाग तसेच दिवाबत्ती विभागातील कर्मचाऱ्यांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला. कामगारांना सप्रेम भेटवस्तू देऊन त्यांच्या सेवाभावाचे कौतुक करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून चौधरी हे नित्यनियमाने हा उपक्रम राबवत असून, “कामगारांच्या पाठीवर कौतुकाची थाप हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा असते,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या सत्कार सोहळ्यात संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. या उपक्रमामुळे कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून त्यांनी माजी नगरसेवक चौधरी यांचे मन:पूर्वक आभार मानले. समाजात आपुलकी, आदर आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरला आहे.




