रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- अमळनेर शहरातील गलवाडे रोड राज्य मार्ग क्र. ०८ वरील बार दाजीबा नगर ते पिंपळे नाला परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असून, येथे शाळकरी मुलांची वर्दळ कायम असते. या रस्त्यावरून वेगवान वाहनांची वाहतूक सुरू असल्याने अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची तसेच सूचना फलक व झेब्रा क्रॉसिंगची मागणी केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सदर परिसरात शाळा आणि निवासी वसाहती असल्याने सकाळ-संध्याकाळी विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. परंतु, रस्त्यावर वेगमर्यादा किंवा गतिरोधक नसल्याने वाहनचालक बेशिस्तपणे वेगाने वाहने चालवतात. मागील काही वर्षांत झालेल्या अपघातांचा विचार करता तात्काळ उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.
सदर मागणीसाठी नागरिकांनी एकत्र येऊन लोकनिर्माण विभागास लेखी निवेदन दिले असून, दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनावर दिपक चौघुले, बाळासाहेब संदानशिव, संदीप नाईक, महेश कालार, राहुल शर्मा, संजय चौधरी, गोपाल पाटील, पंकज चौधरी, राहुल पुकळे, गणेश जोशी आदी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून त्यांनी तात्काळ ब्रेकर बसवण्याची मागणी केली आहे.
नागरिकांच्या या मागणीची दखल घेऊन रस्त्यावर गतिरोधक, सूचना फलक, वेगमर्यादा फलक व झेब्रा क्रॉसिंग बसविण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




