रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- तालुक्यातील नगाव खूर्द, नगाव बुद्रुक, गढखांब तसेच पंचक्रोशी परिसरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिके तसेच काढणीस आलेले कापूस आणि मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
एकीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीत पिकांना अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत होता. त्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर मोठा आघात करून चिंता आणखी वाढवल्या आहेत. विशेषतः कापूस व मका या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया विभागाचे तालुकाध्यक्ष मयूर अनिल बोरसे आणि विपुल किरणगीर गोसावी यांनी शेतकरी बांधवांच्या वतीने प्रशासन आणि जनप्रतिनिधींना तात्काळ मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
“अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत, तसेच मागील रखडलेली भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत बोरसे व गोसावी यांनी अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल दादा पाटील आणि खासदार स्मिता ताई वाघ यांना विनंती केली आहे की, त्यांनी या परिस्थितीची गंभीर दखल घेऊन प्रशासनाला त्वरीत पंचनाम्याचे आदेश द्यावेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.
“शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ कागदोपत्री पाहण्याऐवजी, प्रशासनाने प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीचे योग्य मूल्यमापन करावे व लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी,” असेही त्यांनी नमूद केले.
तसेच त्यांनी स्पष्ट केले की, महायुती सरकारच्या जीआरनुसार अमळनेर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनाही तत्काळ मदत मिळावी, अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे




