रिपोर्टर नूरखान
ग्रामपंचायतीत “सदस्य” ही फक्त एक ओळख नसून ती जबाबदारीची, सेवा भावनेची आणि उत्तरदायित्वाची भूमिका आहे. पण सध्याच्या अनेक गावांमध्ये या पदाचा केवळ प्रतिष्ठेसाठी उपयोग होतो आहे, कामासाठी नव्हे!
अमळनेर :- गावाच्या विकासात ग्रामपंचायत सदस्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. परंतु अनेक ठिकाणी दिसून येते की हे सदस्य निवडून आल्यावर जनतेशी संपर्क ठेवत नाहीत, विकासकामांमध्ये सहभागी होत नाहीत, बैठकीत गप्प बसतात आणि सरपंचाच्या प्रत्येक निर्णयावर मान डोलावत बसतात.
अशा निष्क्रिय सदस्यांमुळे गावातील अनेक समस्या वाढतात, निधीचा अपव्यय होतो आणि ग्रामसभा केवळ औपचारिकतेपुरती उरते.
“सदस्य म्हणजे काय?” – यावर नव्याने विचार करण्याची गरज.
ग्रामपंचायत सदस्य म्हणजे लोकांचा प्रतिनिधी. त्याने आपल्या वार्डातील समस्या जाणून घ्याव्यात, गावसभेत त्या मांडाव्यात, निधीच्या वापरावर लक्ष ठेवावे, आणि गरज पडल्यास प्रशासनाला जाब विचारावा — ही त्याची जबाबदारी आहे. मात्र अनेक सदस्य केवळ “मेंबर” या नात्याने मिरवताना दिसतात.गावागावात अशीच स्थिती — आणि त्याचे परिणाम : निधीचा गैरवापर व भ्रष्टाचार अपूर्ण विकासकामे,ग्रामसभा निष्क्रिय
जनतेत निराशा व राजकारणाप्रती उदासीनता
“गप्प सदस्य” = “गप्प गाव”
सदस्य गप्प राहिला, तर गाव गप्प राहतं — हे समीकरण आज अनेक ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेषतः मागील ५–१० वर्षांत अशा निष्क्रियतेमुळे गावात फारशी प्रगती झालेली नाही, हे लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे.
जनतेला जागं होण्याची गरज.
निवडणुकीत उमेदवाराचा मागील कामकाजाचा हिशेब विचारणं ही जनतेची जबाबदारी आहे. “हा आपला माणूस आहे” किंवा “पक्षाचा आहे” या भावनेपेक्षा “हा काय काम करतो?” हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो.
विचार करायला लावणारा संदेश.
“लोकशाही तेव्हा मरते, जेव्हा जनता आपल्या निवडलेल्या सदस्यांकडून काम मागणं थांबवते.” गावाचा कारभार फक्त सरपंच चालवत नाही, तर तो चालतो सदस्यांच्या सक्रिय सहभागावर. म्हणूनच सदस्यांनी “मी कोण?” हे विचारणं थांबवून, “मी काय केलं?” हे विचारायला सुरुवात करावी — आणि जनतेनेही आपला हक्क मागण्याचं थांबवू नये.