रिपोर्टर नूरखान
अमळनेर :– अमळनेर तालुक्यातील हेडावे नाक्याजवळ गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर वाहनाने रस्त्यावरून पायी जाणाऱ्या तिघांना जोरदार धडक दिली. या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातात विश्वनाथ हिम्मत भिल्ल आणि त्यांची पत्नी ज्योत्याबाई भिल्ल रा. एकरुखी यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाळू साहेबराव पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. अपघातानंतर आयशर वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. पाहणाऱ्यांचे डोळे पाणावले. मृत दांपत्याच्या निधनाने एकरुखी गावावर शोककळा पसरली आहे.
अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी वाहनाचा वेग आणि बेफिकीरपणा यामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
स्थानिक प्रशासन व पोलिसांनी अपघाताची नोंद घेत तपास सुरू केला असून वाहनचालकावर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.