रिपोर्टर नूरखान
तीन बहिणी आणि दोन भाऊ ढोल वाजवत पोहोचले अमळनेरला; लोककलांनी जिंकली अमळनेरकरांची मने.
अमळनेर : – सध्या देशभरात वाढत्या बेरोजगारीमुळे तरुण वर्ग रोजगाराच्या शोधात गावोगाव फिरत आहे. अशाच परिस्थितीत नागपूर येथून आलेले तीन बहिणी आणि दोन लहान भाऊ आपल्या उदरनिर्वाहासाठी अमळनेर शहरात दाखल झाले असून, ढोल वाजवून आणि पारंपरिक गीतांची सादरीकरण करून त्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे.
आज अमळनेर तहसील कार्यालयाच्या आवारात या लहान कलावंतांनी ढोल वाजवून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित प्रेरणादायी गीते सादर केली. त्यांच्या आवाजातील तीव्र भावना आणि तालबद्ध वादन पाहून अनेक नागरिक थांबून गेले, शांततेने आणि कौतुकाने त्यांनी हे सादरीकरण ऐकले.
नागपूरहून आलेले हे पाचही बहीण-भावंडं अतिशय गरीब घरातून असून, कोणतीही आधुनिक सुविधा किंवा आर्थिक आधार नसताना त्यांनी केवळ आपल्या कलेच्या जोरावर लोकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. त्यांच्या ढोल वादनात केवळ गाणं नव्हतं, तर त्यांच्या संघर्षाची, जिद्दीची आणि आत्मसन्मानाची एक जिवंत झलक होती.
या लहानग्यांच्या वादनाने एक क्षणभरासाठी का होईना, परंतु शहरातील नागरिकांना पारंपरिक लोककलांची आठवण करून दिली. लोककला ही आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा असून, अशा कलाकारांना प्रोत्साहन देणं, ही आपली जबाबदारी आहे.