रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- तालुक्यातील मांडळ परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईस गेलेल्या तलाठी अधिकाऱ्यांना विरोध करत दोन इसमांनी सरकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी तसेच धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना मंगळवार, दिनांक २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गोपाळ बाळू पाटील (रा. सातरणे, ता. धुळे) आणि अजय ईश्वर कोळी (रा. मांडळ, ता. अमळनेर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या सूचनेनुसार तलाठी [
(तक्रारदाराचे नाव) यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह (विकेश भोई आणि विक्रम कदम, तलाठी) मांडळ गावाजवळ विना क्रमांकाचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर थांबवले, ज्यामध्ये वाळू भरलेली होती. परवान्याबाबत चौकशी केली असता चालकाने टाळाटाळ केली आणि स्वतःची ओळख सांगण्यास नकार दिला.
दरम्यान, गोपाळ पाटील आणि अजय कोळी या ठिकाणी आले व त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांशी वाद घालत, तलाठी विक्रम कदम यांना ट्रॅक्टरवरून जबरदस्तीने खाली ओढले. यावेळी शिवीगाळ करत धमकी देत, “तुम्हाला पाहून घेतो”, असे शब्द वापरण्यात आले. विकेश भोई यांनाही अडवण्यात आले. यानंतर आरोपी गोपाळ पाटील ट्रॅक्टर घेऊन घटनास्थळावरून पळून गेला.
घटनेचा व्हिडीओ तलाठी अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड केले असून तो पोलिसांना सादर करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 186, 353, 504, 506, 379 तसेच खनिज कायद्यानुसार (MMDR Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उ.नि. युवराज बागुल करीत आहे.