रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- येथील एस.टी. आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जालना येथे दीपक बोराडे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अमळनेर येथील सकल धनगर समाज आणि राजे मल्हार होळकर प्रतिष्ठान यांच्या वतीने आज तहसील कार्यालयात तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांना निवेदन देण्यात आले. १७ सप्टेंबरपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, जालना येथे दीपक बोराडे उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असूनही शासनाने अद्याप याची दखल घेतलेली नाही, अशी खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली.
या निवेदनात धनगर समाजाचे आरक्षण वर्षानुवर्षे प्रलंबित असून शासनाकडून वेळोवेळी केवळ आश्वासने दिली गेली, मात्र ठोस कृती झालेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले. बारामती येथे झालेल्या सभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला एस.टी. आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आजतागायत त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही.
“दोन दिवसांच्या आत धनगर समाजाच्या घटनादत्त एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास, उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या पुढील सूचनेनुसार राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा या वेळी देण्यात आला.
या निवेदनावर बन्सीलाल भागवत, एस.सी. तेले सर, प्रदीप कंखरे, रमेशदेव शिरसाठ, आनंदा हडप सर, एबी धनगर सर, दिलीप खांडेकर, तुषार इदे, संजय धनगर मांडळ, रमेश धनगर, दशरथ युवराज लांडगे, विजय हिवराळे, सचिन शिरसाठ, दत्तात्रय धनगर, नामदेव ठाकरे, तुकाराम ठाकरे, परशुराम ठाकरे आदींच्या सह्या आहेत.
धनगर समाजातील युवकांमध्ये सध्या प्रचंड असंतोष असून, लवकर निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.