रिपोर्टर नूरखान
नियमबाह्य जाहिरात प्रसिद्ध करून बेरोजगारांकडून लाखोंची परीक्षा फी वसूल; फसवणूक झालेल्या अर्जदारांचे उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन.
अमळनेर : – राज्य शासनाच्या स्पष्ट आदेशानंतरही अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने बेकायदेशीरपणे पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करून बेरोजगार उमेदवारांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ फसवणूक झालेल्या अर्जदारांनी २४ सप्टेंबर २०२५, छत्रपती शिवाजी महाराज द्वितीय राज्याभिषेक दिनी, अमळनेर उपविभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
शासन आदेशाला झुगारून जाहिरात.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांनी १९ मे २०२५ रोजी राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील पदभरती प्रक्रियेस स्थगिती दिली होती. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक, जळगाव यांनीही ०१ ऑगस्ट २०२५ रोजी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भरती थांबवण्याचे आदेश दिले.
मात्र या आदेशांचे उल्लंघन करत कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव व सभापती यांनी १० ऑगस्ट २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करून त्रयस्थ एजन्सीमार्फत अर्ज व परीक्षा शुल्काच्या नावाखाली लाखो रुपयांची वसुली केली. ही संपूर्ण भरती प्रक्रिया नियमबाह्य, बेकायदेशीर आणि आर्थिक फायद्यासाठी राबवली गेल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
आंदोलनाची मागणी.
निंबा धुडकू पाटील (रा. वाघोदे) आणि हर्षल अशोक जाधव (रा. सोनखेडी) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. फसवणूक झालेल्या अर्जदारांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत परीक्षा फी परत मिळावी व जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
जिल्हा उपनिबंधकांनी आंदोलकांशी चर्चा करताना मान्य केले की भरती प्रक्रिया बेकायदेशीर आहे. मात्र अद्याप शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने, आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
पुढील आंदोलनाचा इशारा.
युवा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हर्षल जाधव यांनी इशारा दिला आहे की, जर शासनाने लवकरच परीक्षा फी परत केली नाही आणि दोषींवर कारवाई केली नाही, तर तालुक्यात मोठे आंदोलन उभारण्यात येईल.
मागण्या,परीक्षा फीच्या नावाखाली वसूल केलेली रक्कम अर्जदारांना परत द्यावी.नियमबाह्य भरती जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या सचिव व सभापती यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.अशा प्रकारच्या घटनांना आळा बसण्यासाठी शासनाने स्पष्ट व कडक निर्देश जारी करावेत.