रिपोर्टर नूरखान
अमळनेर :– राज्यातील विविध विभागांमध्ये खोट्या अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्यांवर आता सरकारकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आयएएस तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व ३४ जिल्हा परिषदांना यासंदर्भात काटकसर तपासणीचे आदेश दिले आहेत.
या मोहिमेअंतर्गत शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, बांधकाम, शाळा-काॅलेज कर्मचारी यांच्यासह सर्व विभागातील अपंगत्व दाखले आणि UDID कार्डांची सत्यता तपासली जाणार आहे.
या तपासणीसाठी एक महिन्याचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, संबंधित जिल्हा परिषदांना अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.
अमळनेर तालुक्यातील गंभीर प्रकार .
अमळनेर तालुक्यात काही तलाठी आणि ग्रामसेवकांनी खोट्या अपंग प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकऱ्या मिळवल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही कर्मचारी अशा प्रकारे शासनाची फसवणूक करत असल्याची माहिती समोर आली आहे.
तपासणीत जर कोणी खोटं प्रमाणपत्र वापरल्याचं सिद्ध झालं, तर संबंधित कर्मचाऱ्यांचा सरकारी लाभ तत्काळ रद्द करण्यात येणार आहे,
तसेच कायदेशीर फौजदारी कारवाईही केली जाणार आहे. खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्याचा उद्देश.
या कारवाईमागे शासनाचा उद्देश फसवणूक करणाऱ्यांवर वचक बसवणे आणि खऱ्या गरजूंना योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे. अनेक खऱ्या अपंग नागरिकांना अपात्रांनी जागा अडवल्यामुळे योजनांचा लाभ मिळत नव्हता.
राज्यभरातील सर्व विभागांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून, खोटे दाखले सादर करणाऱ्यांची आता खैर नाही.