रिपोर्टर नूरखान
जळगाव :- यावल तालुक्यातील दोन गंभीर गुन्ह्यांप्रकरणी निष्पक्ष व तातडीची कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी एकता संघटनेने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, यावल पोलीस ठाणे आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या शिष्टमंडळात जिल्ह्यातील विविध भागांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.
मुस्लिम युवक इमरान पटेलवर लक्षित हल्ला?
दहीगाव (ता. यावल) येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या हत्या प्रकरणात इमरान पटेल या युवकाचा मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात किरकोळ वादातून झालेली हत्या असे सांगितले जात असले, तरी या घटनेमागे धर्माधारित लक्षित हल्ल्याचा संशय असल्याचे एकता संघटनेचे म्हणणे आहे.
याप्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या १७ जुलै २०१८ रोजी दिलेल्या “तहसीन पूनावाला विरुद्ध युनियन ऑफ इंडिया” या निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्हावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली.
याशिवाय, घटनेत सहभागी असलेल्या दोन युवतींवरही कायदेशीर कारवाई व्हावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पाच वर्षीय बालकावर अमानुष अत्याचार व खून.
या दुसऱ्या गंभीर घटनेत, एका पाच वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार करून त्याचा गळा दाबून खून करण्यात आला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही निदर्शनास आले आहे.
फिर्यादींनी पोलीस तपासात इतर आरोपींची नावे स्पष्टपणे नमूद केली असून, सीसीटीव्ही फुटेज व अन्य तांत्रिक पुराव्यांमधून त्यांचा सहभागही उघड झाला आहे.
तरीही पोलीस प्रशासनाकडून अद्याप योग्य ती कठोर व त्वरीत कारवाई होत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
“तहसीन पूनावाला” निर्णयानुसार चौकशी करा — एकता संघटना
एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी स्पष्ट इशारा दिला की,
“या दोन्ही प्रकरणांमध्ये निष्पक्ष आणि कठोर कारवाई झाली नाही, तर संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल आणि उच्च न्यायालयात दाद मागेल.”
संघटनेच्या प्रमुख मागण्या.
- दोन्ही प्रकरणांची निष्पक्ष व जलद चौकशी करण्यात यावी.
- पीडित कुटुंबांना BNS कलम ३९६ अंतर्गत त्वरित आर्थिक मदत द्यावी.
- खटल्यांची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करून, ६ महिन्यांत निकाल लावावा.
- दोषींना कठोर शिक्षा देऊन समाजात आदर्श निर्माण करावा.
पोलीस निरीक्षकांनी दिले कारवाईचे आश्वासन.
फिर्यादी यासीन खान (पीडित बालकाचे आजोबा) आणि युनूस पटेल (इमरानचे वडील) यांनी आपल्या पुरवणी जबाबांमध्ये गुन्ह्यात इतर आरोपींचा सहभाग असल्याचे पुराव्यांसह सादर केले.
संघटनेने सुप्रीम कोर्टाचे संदर्भ, पेनड्राईव्ह व गोपनीय पत्रकेही यावेळी पोलीस निरीक्षक धारबळे यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांनी लवकरच इतर आरोपींविरोधात कारवाईचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात यांचा सहभाग.
या शिष्टमंडळात फारुक शेख, हाफिज रहीम पटेल, अन्वर शिकलगर, अनिस शाह, ॲड. आवेश शेख, युनूस पटेल (दहीगाव), यासीन खान (यावल), जफर शेख, करीम मेंबर, कुर्बान मेंबर (फैजपूर) यांच्यासह दहीगाव व यावल येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.