रिपोर्टर नूरखान
अमळनेर – गणेशोत्सव आणि ईद सण एकाच वेळी येत असल्याने येथील समाजात शांततेचे वातावरण राखण्यासाठी मुस्लिम समुदायाने एक सकारात्मक आणि संयमित निर्णय घेतला आहे. डीवायएसपी विनायक कोते यांनी मुस्लिम बांधवांना गणेशोत्सव आणि ईद सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी ईद सण आल्यानंतर समाजातील काही तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते, हे लक्षात घेत पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस स्टेशनवर मुस्लिम बांधवांची बैठक घेतली. यावेळी निकम यांनी ईद मिरवणुकीसाठी प्रत्येक गटाला स्वतंत्र परवानगी घेण्याची सूचना केली.
यावेळी मुस्लिम पंच मंडळ आणि इदगाह समिती, कब्रस्थान समिती यांनी एकमताने निर्णय घेतला की, ईदच्या मिरवणुकीत डीजे वाजवण्यावर बंदी राहील. तसेच, दोन्ही धर्मीय मिरवणुकीत समाजकंटकांनी गैरफायदा घेत वातावरण अशांत करू नये यासाठी मुस्लिम समुदायाने ईद मिरवणुकीचा कार्यक्रम गणेश विसर्जनानंतर, ८ तारखेला आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे दोन्ही सण शांततेत साजरे होण्याची खात्री मिळाली आहे. मुस्लिम समाजाने घेतलेल्या या निर्णयाचे पोलिस अधिकारी आणि समाजातील इतर नागरिकांनी स्वागत केले आहे.
बैठकीस इदगाह मुस्लिम ट्रस्टचे अध्यक्ष नसीरोद्दीन हाजी, सचिव अकलाक मौलाना, रज्जाक शेख, रियाज मौलाना यांसह अनेक प्रतिष्ठित मुस्लिम बांधव उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर आभार सिद्धांत शिसोदे यांनी मानले.