अमळनेर (दि. ३०) – अमळनेर तालुक्यातील मारवड मंडळातील वासरे गावात २९ ऑगस्ट रोजी झालेल्या १२० मिमी पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. वासरे येथील पुराच्या पाण्यात ८० कुटुंबांची घरं होऊन या कुटुंबांच्या अन्नधान्य, घरातील वस्तू व जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालं आहे. परिणामी, अनेक कुटुंबं उघड्यावर आले आहेत.
तत्काळ मदत कार्य सुरू करत प्रशासनाने या कुटुंबांना उंच ठिकाणी असलेल्या घरांमध्ये व समाज मंदिरात आश्रय दिला. ग्रामपंचायतीने शिधा वितरण केल्याचेही कळले आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांसाठीही ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक ठरली आहे. ढगफुटी सदृश पावसामुळे मका, कपाशी, उडीद, मूग या पिकांचा मोठ्या प्रमाणावर नाश झाला असून शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर बनली आहे.
प्रशासनाचे तत्काळ पाऊल:
वातावरणीय परिस्थिती पाहता उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे आणि तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना तातडीने मदतीसाठी पाठवले. तसेच, घटनास्थळी खासदार स्मिता वाघ, माजी जिप सदस्य जयश्री पाटील, डॉ. अनिल शिंदे आणि इतर स्थानिक नेत्यांनी भेट देऊन आपदग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाशी संपर्क साधला.
तातडीने पंचनामे:
खासदार स्मिता वाघ आणि आमदार अनिल पाटील यांनी प्रशासनाला नुकसानाच्या पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तथापि, दुसऱ्या दिवशीही पाऊस सुरू असल्यामुळे नुकसानाचे प्रमाण आणि किती घरं पूर्णपणे पडली, याबाबत पूर्ण माहिती मिळवता येऊ शकले नाही.
केंद्र आणि राज्य शासनाने मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.