रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- येथील श्रीमती द्रौ.रा. कन्या शाळेत क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचे नातू अमित आझाद व पत्नी नेहा आझाद यांचे आगमन झाले. मुख्याध्यापिकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अमित आझाद यांनी क्रांतिकारी इतिहासातील तेजस्वी परंपरेची उजळणी केली. “वंदे मातरम, भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद” हे घोषवाक्य राष्ट्रभावनेला पेटवणारे असून आजही तेवढीच उर्जा देतात, असे त्यांनी ठासून सांगितले.देशाचा भविष्यातील वैज्ञानिक, राष्ट्रपती, आयपीएस अधिकारी हे याच शाळांमधून घडतात, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देत त्यांनी मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले.झांशीची राणी, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि चंद्रशेखर आझाद यांच्या संघर्षमय गाथांवर त्यांनी थोडक्यात प्रकाश टाकला. आझाद यांच्या जन्मस्थळ छबुवा (म.प्र.) व बलिदानभूमी प्रयागराज (उ.प्र.) यांचा उल्लेख करीत १९१६ मधील प्रसंग त्यांनी सांगितला—१४ वर्षांच्या आझाद यांनी इंग्रजी सिपायावर केलेल्या प्रतिकारानंतर झालेली मारहाण, त्यावेळी त्यांच्या तोंडून सतत उमटणारे “भारत माता की जय, वंदे मातरम” हे घोष…जेलरच्या चौकशीला दिलेली त्यांची अढळ उत्तरे—“माता–आझादी, पिता–स्वतंत्रता, वास्तव्य–जेलखाना, नाव–चंद्रशेखर आझाद”—याची उजळणी करत त्यांनी विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांची धार पुन्हा स्मरवली.देशाच्या स्वातंत्र्यात ७ लाख ३२ हजार क्रांतिकारकांचे रक्त सांडले असल्याचे स्पष्ट करून “काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तर पराभव हा शब्द नसतो” असा संदेश त्यांनी दिला.कार्यक्रमास एच आर आर्मीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कमलेश कुलकर्णी, जिल्हा प्रभारी आनंद चव्हाण, विभाग प्रभारी कौशल परदेशी, ग्रामीण प्रभारी सचिन खोरे व संकेत मांडे उपस्थित होते.सूत्रसंचालन डी. एन. पालवे यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक एस. एस. वाघ यांनी मानले.ज्येष्ठ शिक्षिका आर.एस. सोनवणे, ज्येष्ठ लिपिक श्याम पवार, तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.




