रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून जितेंद्र (जितू) ठाकूर यांचे नाव शहरात चर्चेत आहे. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले आणि शहरातील दैनंदिन समस्यांचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या ठाकूर यांच्या इच्छुक उमेदवारीबाबत नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आल्याचे दिसते.
गेल्या सुमारे दोन दशकांपासून ठाकूर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून रस्त्यांची अवस्था, पाणीपुरवठा, नालेसफाई, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. स्थानिक पातळीवरील अनेक प्रश्नांना त्यांनी उजाळा दिल्यामुळे त्यांची ओळख “जनतेचा आवाज” अशी तयार झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्पष्ट व्हिजन आणि छोटे-मोठे प्रश्न सोडवण्यासाठी तत्परता ही ठाकूर यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये असल्याचे काही नागरिकांचे मत आहे. “शहरातील सामान्य माणसाच्या अडचणींची त्यांना प्रत्यक्ष जाण आहे,” अशी प्रतिक्रिया शहरातील विविध भागांतून व्यक्त होत आहे.
शहरातील व्यापारी परिसर, मुख्य बाजारपेठ आणि नव्याने विकसित होत असलेल्या भागांत ठाकूर यांच्या इच्छुक उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे दिसते. अनेकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून आपला प्रतिसाद दिल्याची माहिती मिळते. युवक मतदारांमध्येही त्यांच्या नावाविषयी उत्सुकता असल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जाते.
समर्थकांच्या म्हणण्यानुसार, पारदर्शक प्रशासन, जवाबदारी आणि नागरिकांसोबत सातत्यपूर्ण संवाद यावर आधारित स्थानिक नेतृत्वाची गरज असल्यामुळे ठाकूर यांना मिळणारा प्रतिसाद वाढत असल्याचे ते सांगतात.




