रिपोर्टर नूरखान
समाजकार्यात सक्रीय दाम्पत्याचा नागरिकांशी थेट संपर्क.
अमळनेर :- अमळनेर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक ९ मधून सौ. सपना बापू चौधरी या नगरसेविका पदासाठी इच्छुक असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या चौधरी दाम्पत्याची ओळख शहरात जनसंपर्काच्या माध्यमातून बळकट झाली आहे. सौ. सपना चौधरी या महिलांच्या समस्या, स्वच्छता, आरोग्य, तसेच तरुणांसाठी रोजगाराच्या संधी यांसारख्या विषयांवर काम करण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
“कुणीतरी येऊन बदल घडवेल अशी अपेक्षा न ठेवता, आपणच त्या बदलाचा भाग व्हावे,” असे मत सौ. सपना चौधरी यांनी व्यक्त केले. प्रभागातील विकासकामांना गती देणे, नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडवणे आणि प्रशासनाशी समन्वय साधत लोकाभिमुख निर्णय घेणे हा आपला उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांचे पती बापू चौधरी हे गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, गोरगरिबांच्या अडचणींना न्याय देण्यासाठी नेहमी पुढाकार घेतात. सर्व धर्मीय बांधवांमध्ये ऐक्य आणि सौहार्द निर्माण करण्यासाठीही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये या दाम्पत्याबद्दल आदरभाव असून, त्यांच्या उमेदवारीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे. प्रभाग क्रमांक ९ मध्ये चौधरी दाम्पत्याची लोकप्रियता लक्षात घेता आगामी निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.




