रिपोर्टर नूरखान
मराठवाडा–खान्देश प्रवास होणार अधिक सुरक्षित; खासदार स्मिता वाघ यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा रंगला.
अमळनेर :- धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम घाट हा राज्यातील सर्वात धोकादायक घाट म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षांपासून या घाटावरून जाणाऱ्या वाहनचालकांना अपघात, वाहतूक कोंडी आणि विलंबाचा सामना करावा लागत होता. अखेर या घाटावरून प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने ५.५० किलोमीटर लांबीच्या अत्याधुनिक बोगद्याच्या बांधकामास मंजुरी दिली आहे.
सुमारे ₹२,४३५ कोटी खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी टेलवाडी ते बोधरे या सुमारे १५ किलोमीटरच्या टप्प्यात होणार आहे. या बोगद्यामुळे संभाजीनगर–पुणे मार्गावरील प्रवास वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, अपघातांचे प्रमाणही घटेल.
“औट्रम घाट आता इतिहासजमा होणार” — खासदार स्मिता वाघ.
“औट्रम घाट हा नागरिकांसाठी नेहमीच धोकादायक ठरला आहे. अनेक अपघात, वाहतूक कोंडी आणि प्रवाशांचा त्रास लक्षात घेऊन बोगदा उभारावा, अशी जनतेची मागणी होती. त्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करून अखेर केंद्र सरकारकडून मंजुरी मिळवण्यात आम्ही यशस्वी झालो. हा निर्णय महाराष्ट्राच्या विकास प्रवासातील ऐतिहासिक टप्पा ठरेल,” असे खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले.
त्यांनी पुढे म्हटले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सडक वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यातील रस्त्यांचे आधुनिकीकरण वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे इंधन बचत, वेळेची बचत, अपघातांमध्ये घट आणि पर्यावरणावरचा ताण कमी होईल.”
मंत्र्यांचा पाठपुरावा फळास आला.
या प्रकल्पासाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, खासदार स्मिता वाघ आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला. केंद्र सरकारने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.
प्रकल्पाचे तांत्रिक तपशील बोगद्याची लांबी: ५.५० किलोमीटर मार्ग: टेलवाडी ते बोधरे (१५ किमी टप्पा) एकूण खर्च: ₹२,४३५ कोटी वाहन वेग: ताशी १०० किमीपर्यंत डबल ट्यूब स्ट्रक्चर.सुरक्षा सुविधा फायर सिस्टिम, डिजिटल सेन्सर, सीसीटीव्ही, वाहन नियंत्रण केंद्र व आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग या बोगद्यामुळे औट्रम घाटावरील अपघातप्रवण वळणे आणि तीव्र उतार इतिहासजमा होणार आहेत. मराठवाडा–खान्देश दरम्यान प्रवासाचा वेळ व अंतर दोन्ही घटणार असून, आर्थिक तसेच औद्योगिक विकासालाही नवी चालना मिळेल.




