रिपोर्टर नूरखान
अमळनेर : – तालुक्यातील जळोद प्र. शिवारात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू असून, बेकायदेशीर वाळू उपशामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. दीपावलीच्या सुट्ट्यांदरम्यान तलाठी आणि महसूल विभागाचे अधिकारी अनुपस्थित असल्याचा गैरफायदा घेत वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळोद प्र. परिसरात गेल्या काही दिवसांपासून जेसीबीच्या साहाय्याने वाळू भरून ती ट्रॅक्टर व डंपरमधून नेली जात आहे. या अवैध वाळू व्यवसायामुळे शासनाला मोठ्या प्रमाणावर महसुलाचे नुकसान होत असून, पर्यावरणावरही गंभीर परिणाम होत आहेत.
ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. “दीपावली संपली, आता तरी महसूल विभागाने जागे होऊन वाळू माफियांवर अंकुश आणावा,” अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.




