रिपोर्टर नूरखान
अमळनेर : – शहरातील निकुंभ कॉम्प्लेक्स परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बेशिस्त पार्किंगच्या समस्येमुळे व्यापारी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बाजारपेठेत येणारे काही वाहनचालक आपल्या चारचाकी गाड्या कुठेही उभ्या करून बाजारहाटीसाठी निघून जातात, त्यामुळे संपूर्ण रस्ता अडवला जातो आणि वाहतुकीत अडथळा निर्माण होतो.
या अव्यवस्थित पार्किंगमुळे परिसरातील दुकानदार त्रस्त झाले आहेत. ग्राहकांना ये-जा करण्यात अडचणी निर्माण होत असल्याने व्यवसायावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. काही वेळा या बेशिस्त पार्किंगमुळे वाद-विवादाच्या घटना घडल्याचेही निदर्शनास आले आहे.
स्थानिक व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असून, वाहतूक पोलिसांनी आणि नगरपालिकेने संयुक्तपणे कारवाई करून या ठिकाणी शिस्तबद्ध पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.
प्रशासनाने वेळेत लक्ष न दिल्यास या समस्येचा अधिक गंभीर स्वरूप धारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.




