रिपोर्टर नूरखान
अमळनेर -: शहराच्या मध्यवर्ती भागातील महाराणा प्रताप चौकासमोर पादचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेले फूटपाथ व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणामुळे पूर्णत अडचणीत आले आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना रस्त्याने चालणेही कठीण झाले असून, वाहतुकीला गंभीर अडथळे निर्माण होत आहेत.
या परिसरात अनेक दुकानदारांनी आपले सामान, हॉटेलचे साहित्य, खाद्यपदार्थचे स्टॉल्स आणि इतर विक्रीसाठी लागणाऱ्या वस्तू थेट फूटपाथवरच मांडल्या आहेत. काही ठिकाणी तर दुकानांपुढील रस्ता अर्ध्यापेक्षा जास्त व्यापला गेला आहे. परिणामी, नागरिकांना मोटारसायकल्स आणि चारचाकी गाड्यांच्या मध्येच चालावे लागत आहे. या अतिक्रमणामुळे अपघाताची शक्यता प्रचंड वाढली आहे.
नागरिकांनी असा आरोप केला आहे की, “नगर परिषद फक्त गोरगरीब फेरीवाल्यांवरच कारवाई करते, मात्र मोठ्या व्यापाऱ्यांकडील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करते. नगर परिषदेची ही दुहेरी भूमिका संतापजनक आहे.”
नगर परिषद अतिक्रमणविरोधी मोहिम राबवते, पण ती निवडक ठिकाणी आणि निवडक लोकांवरच मर्यादित का ठेवली जाते? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पादचाऱ्यांसाठी असलेली जागा व्यापाऱ्यांच्या ताब्यात गेल्यामुळे महिलांना, वृद्धांना, आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
“जर लवकरच अतिक्रमण काढण्यात आले नाही, तर या संदर्भात छायाचित्रांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली जाईल,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
शहराचे सौंदर्य आणि नागरी सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. कायदा सर्वांना समान असला पाहिजे, हीच नागरिकांची अपेक्षा आहे.