रिपोर्टर नूरखान
अमळनेर :-जळगाव येथे ब्रह्माकुमारीज् राजयोग शिक्षण केंद्र, ढाके कॉलनी, जळगाव येथे दीपावलीचा पवित्र सण श्रद्धा, आस्था आणि अध्यात्मिक वातावरणात अत्यंत भावपूर्णरीत्या साजरा करण्यात आला. सेवाकेंद्र आकर्षक आध्यात्मिक रांगोळी, प्रकाशमाळा आणि फुलांनी सजवून दिव्यता व शांतीचे वातावरण निर्माण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात वरिष्ठ राजयोगी सदस्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर केंद्रप्रमुख बीके मीनाक्षी दिदी यांनी दीपावलीचा आध्यात्मिक अर्थ स्पष्ट करताना सांगितले —
“दीपराज म्हणजे परमात्मा शिव आणि दीपराण्या म्हणजे आपण आत्मारूपी राण्या. परमात्मा स्वतः या धरतीवर अवतरित होऊन आपल्याला ज्ञान आणि योगाचा प्रकाश देतात, ज्यामुळे आत्मा पुन्हा गुणसंपन्न आणि शक्तिशाली बनते. दीपावली हा केवळ बाह्य दिव्यांचा सण नसून ज्ञानाचा अज्ञानावर, प्रकाशाचा अंधकारावर आणि गुणांचा अवगुणांवर विजय दर्शवणारा सण आहे.”
या प्रसंगी बीके मीनाक्षी दिदी यांना ‘चैतन्य लक्ष्मी’च्या रूपात सजविण्यात आले व उपस्थितांनी भक्तिभावाने त्यांची आरती केली. राजयोग कॉमेंट्रीच्या माध्यमातून सर्वांनी आत्मशांती, आनंद आणि संपन्नतेचा गहन अनुभव घेतला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते — श्रीलक्ष्मीच्या चैतन्य स्वरूपातून प्रतीकात्मक गुणांचे वरदान घेणे. हे वरदान उपस्थित भावंडांनी एकमेकांमध्ये वाटले आणि आपल्या जीवनात दिव्यता, पवित्रता आणि सहकार्य यांसारख्या गुणांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमात बीके आश्विनी बहन रथ चौक पाठशाळा यांनी दीपावलीचे आध्यात्मिक रहस्य अत्यंत भावपूर्णपणे सांगितले. त्यानंतर मंचावर ब्रह्माकुमारी राजयोग शिक्षिका बहिणींचा सत्कार करण्यात आला.
शेवटी सर्व उपस्थितांनी एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आणि आपले जीवन परमात्मप्रकाशाने उजळून समाजात शांती, प्रेम आणि गुणांचा दीप प्रज्वलित करण्याचा संकल्प केला.
अशा रीतीने ब्रह्माकुमारीज् ढाके कॉलनी येथे दीपावलीचा सण केवळ उत्सव न राहता आध्यात्मिक उत्थान आणि आत्मजागृतीचा प्रेरणादायी प्रसंग ठरला.
संपूर्ण कार्यक्रमाचे कुशल संचालन बीके वर्षा बहनजींनी केले.