रिपोर्टर नूरखान
जळगाव : – केळी उत्पादनासाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात केळी निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात संधी असून, त्यासाठी आवश्यक इको-सिस्टीम उभारणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर चे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र माणगांवे यांनी केले.
१८ ऑक्टोबर रोजी हॉटेल रॉयल पॅलेस, जळगाव येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित सत्कार व उद्योगवाढ चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्षा संगीता पाटील, विश्वस्त मंडळ अध्यक्ष आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, राष्ट्रीय समन्वयक वेदांशू पाटील, दिलीप गांधी, तसेच जिल्ह्यातील विविध औद्योगिक व व्यापारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“जिल्ह्यातील प्रत्येक गावातून किमान पाच व्यक्तींना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यापैकी एखाद्याने यशस्वी उद्योग सुरू केल्यास हजारो नवउद्योजक तयार होऊ शकतात. इच्छुक तरुणांसाठी चेंबरमार्फत प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येईल,” असे माणगांवे यांनी सांगितले.
चेंबरच्या उपाध्यक्षा संगीता पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील शेतीपूरक उद्योगांची वाढती संधी अधोरेखित करताना सांगितले की, डाळ मिल, चटई उद्योग आणि विविध लघुउद्योग येथे कार्यरत असूनही, अपेक्षेप्रमाणे औद्योगिक वाढ झालेली नाही. नवीन उद्योजकांसाठी MIDC मध्ये जागेचा अभाव आहे. यासाठी नवीन MIDC मान्यतेसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आहे.
“गोल्ड सिटी प्रकल्पामुळे जळगावचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. तसेच, चेंबरतर्फे लवकरच ‘बिझनेस फोरम’ सुरू करण्यात येणार असून, याचा विविध उद्योगांना लाभ होईल,” असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता खचणे यांनी केले. अरविंद दहाड यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विनकुमार परदेशी, धनराज कासट, महेंद्र रायसोनी, विनोद बियाणी, किरण बच्छाव, राहुल बैसाणे आदींचे विशेष सहकार्य लाभले.