रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- दि. १८/१०/२०२५ रोजी घोषित झालेल्या शासन निर्णयामध्ये अमळनेर तालुक्याचा समावेश न केल्यामुळे तालुक्यातील शेतकरी मदतीपासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट होताच, मा. आमदार शिरीषदादा चौधरी यांनी तात्काळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील यांची पाळधी येथील निवासस्थानी भेट घेऊन निवेदन सादर केले.
या निवेदनात त्यांनी स्पष्ट केले की, अमळनेर तालुक्यातील अनेक शेतकरी अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानाला सामोरे गेले आहेत. यापूर्वीही या नुकसान भरपाईसाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. शासन निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील ३,२५,३५९ शेतकऱ्यांना २४७२६२.०१ हेक्टर क्षेत्रासाठी एकूण ₹२९९९४.४७ लाख मदत जाहीर करण्यात आली असली, तरी अमळनेर तालुक्याचा कुठेही उल्लेख नाही, हे अत्यंत दुःखद आहे.
शिरीषदादा चौधरी यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने विनंती केली की, तात्काळ सुधारित शासन निर्णय जाहीर करून अमळनेर तालुक्याचा समावेश करावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान अमळनेर तालुका शिवसेना प्रमुख सुरेश पाटील, किशोर पाटील, रोशन सोनवणे, मा. नगरसेवक अनिल महाजन व इतर कार्यकर्ते उपस्थित होते