रिपोर्टर नूरखान
अमळनेर :– तालुक्यातील मूडी मांडळ शिवारात पांझरा नदी पात्रातून पुन्हा एकदा अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरु झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही दिवसांपूर्वी तलाठी व वाळू माफियांच्या संघर्षानंतर तात्पुरते थांबवण्यात आलेले वाळू उपसाचे काम आता खुलेआम सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्रत्येक दिवशी वाळूने भरलेले डंपर अमळनेर शहरात मुक्तपणे फिरतांना दिसत आहेत. या डंपरमुळे रस्त्यांवर वाळू सांडत असून, त्याचा परिणाम म्हणून मुख्य रस्त्यांवर मोठे खड्डे तयार झाले आहेत. नागरिकांचे वाहनचालना करणे कठीण झाले असून, अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.
विशेष म्हणजे महसूल विभागाने याकडे पूर्णतः डोळेझाक केली असून, कुठलीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाही. यामुळे वाळू माफियांना महसूल विभागाचा आशीर्वाद आहे का, अशी चर्चा सध्या अमळनेर शहर आणि परिसरात रंगू लागली आहे.
काही प्रश्न उपस्थित होत आहेत.
महसूल विभाग आणि पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई का केली नाही?
मागील हल्ल्याच्या घटनेनंतरही वाळू उपसा पुन्हा सुरू कसा झाला?
परवाना नसताना हे डंपर शहरात खुलेआम कसे फिरत आहेत?
वाळू उपसामुळे नदीपात्राची रचना बिघडत असून, पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच शासनाचे महसूलही बुडत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तात्काळ यामध्ये लक्ष घालून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
नगर पालिका सफाई कर्मचारी रोडवर पडलेली वाळू सफाई करतांना.