रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान तीन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपामुळे राज्यभरातील वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन महावितरणने आपत्कालीन नियोजन पूर्ण केल्याचे स्पष्ट केले आहे.
वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी राज्यभरातील सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, गंभीर कारणाशिवाय सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून, रजेवरील कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महावितरणकडून करण्यात आलेल्या आवाहनानुसार, संघटनांशी सकारात्मक चर्चा करूनही संयुक्त कृती समितीने संपाचा निर्णय कायम ठेवला आहे. परिणामी, महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम (मेस्मा) लागू करण्यात आला असून, या संपाला बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे.
महावितरणकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, संपकाळात वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत राहणार असून, ग्राहक सेवा केंद्रे २४ तास खुली ठेवण्यात आली आहेत.
तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी खालील टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा:
१९१२
१८००-२१२-३४३५, १८००-२३३-३४३५
संपकाळात वीजसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.