धुळे – @ वाहिद काकर
देवपूर पोलीस ठाण्याने महिला अत्याचाराच्या प्रकरणात अत्यंत जलदगतीने तपास करत अवघ्या १८ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ती एचडीएफसी बँकेतून धनदाई हॉस्पिटलकडे जात असताना, आरोपी ज्ञानेश्वर किसन कांरडे (वय ३५, रा. नवे भदाणे, ता. व जि. धुळे) याने तिचा हात धरून विनयभंग केला व जबरदस्तीने गाडीत बसण्यास सांगितले.
या तक्रारीवरून देवपूर पोलीस ठाण्यात भादंवी कलम ७४, ७८, ७९, ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेतले व युद्धपातळीवर तपास करून आवश्यक पुरावे गोळा केले. महाराष्ट्र शासनाच्या “१०० दिवस कृती आराखडा” अंतर्गत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जलदगतीने तपास पूर्ण करून अवघ्या १८ तासांत आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी धनंजय व्हो. पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. महिला पोसई एल.एस. करंकार, असई मिलिंद सोनवणे, पोहेका दीपक विसपुते, महेंद्र भदाणे, तुषार पाटील, रशिद मन्सुरी, भटेन्द्र पाटील, मोहिनी माळी यांनी या कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावली.
महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांबाबत पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता यामुळे अशा गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल. तसेच, सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी न्यायालयाकडे विनंती करण्यात आली आहे.