रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- शहरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून अमळनेर शहरात नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळातही पाणीपुरवठा बंद राहिल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील अनेक भागांत नळातून थेंबभरही पाणी येत नसल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना पाण्याच्या टाक्या, विहिरी किंवा खाजगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. काही भागांत नागरिकांना दररोज सकाळी लांबवरून पाणी आणावे लागत असून, सणाच्या तयारीऐवजी नागरिक पाण्याच्या समस्येत अडकले आहेत.
दरम्यान, अमळनेर नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, भावी नगरसेवक सोशल मीडियावर बॅनरबाजी करतांना दिसत आहेत. मात्र, नागरिकांच्या मूलभूत गरजांपैकी असलेल्या पाण्याच्या प्रश्नावर कोणताही विद्यमान किंवा भावी नगरसेवक पुढे येतांना दिसत नाही, अशी नाराजी नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
खासदार आणि माजी मंत्र्यांचे गाव असूनही अमळनेर शहरात पाणीपुरवठा खंडित राहणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे मत आहे. शहरातील विविध भागांत नागरिकांनी पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करण्याची मागणी केली असून, नगरपरिषदेने तातडीने याकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.




