रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- येथील नगरपरिषद निवडणुकीची घोषणा होताच संपूर्ण अमळनेर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून, निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
राज्यात महायुतीचे सरकार स्थिर असून, त्याच पार्श्वभूमीवर अमळनेरमध्येही महायुतीकडून जोरदार तयारी केली जात आहे. विशेष म्हणजे, अनेक प्रभागांमध्ये महायुतीच्या चार-चार इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे, विरोधकांच्या तयारीत कमतरता जाणवत असल्याने बऱ्याच प्रभागांमध्ये थेट लढतीऐवजी एकतर्फी विजयाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक राजकारणात सध्या महायुतीचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत असून, विविध पक्षांतील अंतर्गत घडामोडींमुळे विरोधी पक्ष संभ्रमात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे निवडणूक आधीच महायुतीच्या पारड्यात पडेल, असे काही राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
शहरातील जनतेमध्ये यंदाच्या निवडणुकीविषयी प्रचंड उत्सुकता आहे. ‘नगराध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागणार?’ हा प्रश्न सध्या प्रत्येकाच्या चर्चेचा विषय ठरतो आहे. अनेक नवोदित तसेच जुन्या राजकीय चेहऱ्यांची नावे पुढे येत असून, महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आगामी काही दिवसांत उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात आणखी उलथापालथ होणार, हे निश्चित आहे.